नेमबाजीत पदकाचे समाधान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नेमबाजीत पदकाचे समाधान
भारताच्या नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांच्या कामगिरीत दुसऱ्या दिवशीही सातत्य राखले. हिमांशू धिल्लों आणि रुद्रांक्ष पाटील यांनी चुरशीच्या अंतिम फेरीत संयम राखून पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझपदक जिंकले. हिमांशू, रुद्रांक्ष आणि १८ वर्षीय पार्थ माने यांनी सांघिक प्रकारातही रौप्यपदकाची कमाई केली. रुद्रांक्ष आणि पार्थ हे दोन्ही नेमबाज महाराष्ट्राचे आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील या कामगिरीमुळे भारताच्या नेमबाजीतील पदकांची संख्या पाच झाली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही भारताला सुवर्ण कामगिरी न करता आल्याने नेमबाजांनाही निराशा लपविता आली नाही.

रुद्रांक्षला ब्राँझ
पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये हिमांशूने रौप्य, तर ठाण्याच्या रुद्रांक्षने ब्राँझपदकाची कमाई केली. पॅरिस ऑलिम्पिकमधील दोन सुवर्णपदकांचा मानकरी आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज चीनच्या शेंग लिआओने या दोघांना मागे टाकून सुवर्णपदक पटकावले. शेंगने २५४.२ गुणांसह स्पर्धेचा आणि आशियाई विक्रम नोंदवला. सोमवारी २१वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हिमांशूने २५२.४ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अव्वल स्थानासाठी आव्हान देण्याची क्षमता दाखवणारा रुद्रांक्ष २३०.९ गुणांसह तिसरा आला.

सांघिकमध्ये रौप्यपदक

वैयक्तिक प्रकारातील पदके मिळण्याच्या अवघ्या तासाभरापूर्वी हिमांशू, माजी जगज्जेता रुद्रांक्ष आणि पार्थ माने यांनी सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. चीनने पुन्हा एकदा सर्वोच्च कामगिरी केली. शेंग, चांगहोंग झांग आणि सिहान मा यांच्या त्रिकुटाने १,८९९.० गुण मिळवले. कैरो येथे गेल्या वर्षी नोंदवलेला स्वतःचाच १,८९८.४ गुणांचा जागतिक विक्रम चीनने सुधारला. भारताने १,८९०.१ गुणांसह रौप्यपदक, तर दक्षिण कोरियाने १,८८४.२ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. रुद्रांक्ष ६३१.८ गुणांसह वैयक्तिक पात्रता फेरीत तिसरा आला. हिमांशू ६३०.० गुणांसह सातवा राहिला. पार्थ मानेने ६२८.३ गुण मिळवत आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात थोडक्यात अपयश आले.

वैयक्तिकमध्ये चुरस

वैयक्तिक अंतिम फेरीत मात्र हिमांशू आणि रुद्रांक्ष यांच्यातील चुरशीची लढत लक्षवेधी ठरली. शेंगने सातत्याने आघाडी वाढवत नेली. मात्र, भारताचे दोन्ही नेमबाज अल्प गुणांच्या फरकाने पदकांसाठी झुंजत होते. रुद्रांक्षने सुरुवातीला चीनच्या नेमबाजाला आव्हान देण्याची शक्यता निर्माण केली होती. रुद्रांक्षने १०६.० गुणांसह शेंगवर १.१ गुणांची आघाडी घेतली होती. हिमांशू १०४.८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, बाद फेरीत चित्र बदलले. रुद्रांक्षचा एक शॉट ९.७ गुणांचा ठरला, तर हिमांशूने १०.६ गुणांचा शॉट लगावला.

सोलापूरमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या पार्थला वयाच्या १३व्या वर्षी नेमबाजीची ओळख झाली. त्याचे पोलीस अधिकारी वडील त्याला शाळेतील उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी घेऊन गेले. येथेच त्याला नेमबाजीची गोडी लागली. चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्याच्या कुटुंबाने मुंबईत स्थलांतर केले. येथे त्याला सुमा शिरूर यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याने पहिल्याच आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्यपदक मिळवले. आज, मंगळवारी होणाऱ्या मिश्र सांघिक प्रकारात त्याला एलावेनिल व्हालारिवनसोबत सहभागी व्हायचे आहे.