Pakistan Carried Out An Airstrike In Afghanistan Tension Escalated
अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानचा हवाई हल्ला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी अफगाणिस्तान सीमेलगतच्या दहशतवादी छावण्या आणि लपून बसण्याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत आत्मघाती हल्लेखोरांसह २८ दहशतवादी ठार झाल्याची माहिती पाकिस्तानने सोमवारी दिली.
पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयानुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट आणि हांगू जिल्ह्यांमध्ये गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांच्या आश्रयस्थानांवर आणि लपण्याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले.मंत्रालयाने म्हटले की, ‘विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे अफगाणिस्तानच्या सीमेलगतच्या भागात फितना अल-ख्वारिज आणि त्याच्याशी संलग्न दहशतवादी संघटनांच्या छावण्या व लपण्याच्या ठिकाणांना अचूक लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तान सरकार आणि लष्कर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी आणि त्याच्याशी संबंधित गटांसाठी ‘फितना अल-ख्वारिज’ हा शब्द वापरतात. या कारवाईत आत्मघाती हल्लेखोरांच्या प्रशिक्षण केंद्रासह तीन ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा आणि दारूगोळा नष्ट करण्यात आल्याचेही पाकिस्तानने सांगितले.