Voter Registration Sir Process Compromised Accuracy
‘एसआयआर’च्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘एसआयआर’ प्रक्रियेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्तांसह लालकृष्ण अडवाणी, एस. जयशंकर, जगदीप धनखड यांना नोटिसा पाठवण्यात आल्याने या प्रक्रियेच्या अचूकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधकांनी त्यावर टीका करताना मॅपिंगमधील त्रुटींची कारणे काय, याची स्पष्ट उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत, अशी मागणी केली.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील तब्बल ३३.१३ लाख मतदारांना प्रगणन अर्जाशी संबंधित माहितीतील त्रुटींमुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदारांच्या नोंदींमध्ये किती त्रुटी आहेत आणि त्यापैकी किती त्रुटी केवळ कागदपत्रे किंवा जुन्या मतदारयादीशी मॅपिंग न झाल्यामुळे निर्माण झाल्या आहेत हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. एसआयआरचा उद्देश मतदारयादी शुद्ध करणे असला तरी त्या प्रक्रियेतच मोठ्या संख्येने मतदारांना नोटिसा मिळत असतील, तर पडताळणीची पद्धत आणि तिच्या अंमलबजावणीची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दिल्लीत नोटीसधारकांना २९ ऑक्टोबरपर्यंत ईआरओकडे कागदपत्रे सादर करायची आहेत.