अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील बडी कंपनी ओरॅकलने भारतातील सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे समजते. तसेच, येत्या एका महिन्यात आणखी नोकरकपात केली जाईल, असे बाधित कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. जागतिक स्तरावर कंपनीने सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
या कपातीचा फटका बसलेल्या दोन व्यक्तींनी, ज्यामध्ये कंपनीच्या मानवी संसाधन विभागातील एका व्यक्तीचा समावेश आहे, त्यांनी याला दुजोरा दिला आहे. कपात केलेल्या कर्मचाऱ्यांसह, ओरॅकलचे भारतात एकूण सुमारे ३० हजार कर्मचारी आहेत. यावर ओरॅकलने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ओरॅकलने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, काही संघटनात्मक बदलांमुळे कामकाज सुव्यवस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांमुळे दुर्दैवाने तुमचे सध्याचे पद आता कंपनीसाठी आवश्यक राहिलेले नाही.
कंपनीने बाधित कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची ऑफर दिली आहे. यानुसार, भारतात एक वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ दिवसांचा पगार मिळेल.





