‘मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात वादळी वारा आणि गारपीटीमुळे राज्यात १ लाख २२ हजार हेक्टरहून ( ३ लाख ५ हजार एकर) अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात येतील; तसेच बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल,’ अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी दिली.
भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे भेट देऊन दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी फळगळ, झाडांचे नुकसान; तसेच उभ्या पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
‘नाशिक (२९,८१२ हेक्टर), अहिल्यानगर (२३,६३३ हेक्टर), जळगाव (२२,३६१ हेक्टर), धुळे (१४,८३२ हेक्टर), बुलढाणा (८,५०७ हेक्टर) व छत्रपती संभाजीनगर (८,४४५ हेक्टर) आदी जिल्ह्यातील पिके नष्ट झाली आहेत,’ असे भरणे यांनी सांगितले.


