पुणे : शहरात गुरुवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे स्वारगेट बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात व परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. स्वारगेट बसस्थानकातील पाण्याचा निचरा होणारी चेंबरची क्षमता अपुरी असल्यामुळे पाण्याचे तळे साचले होते. बस पकडण्यासाठी प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांचा तोल जाण्याच्या घटना घडल्या.
पावसामुळे बससेवाही काही प्रमाणात विस्कळित झाली होती. उशिरा धावणाऱ्या बस आणि गर्दीमुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला. गेल्या काही वर्षांपासून जोरदार पाऊस झाल्यानंतर स्वारगेट स्थानकात पाणी साचून प्रवाशांना त्रास होतो; पण त्यावर काहीही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.


