पुणे : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतीपिकांना फटका बसला. त्यामुळे पुरंदर, इंदापूर, हवेली, भोर अशा आठ तालुक्यांमधील ६९ गावांमधील १५३२ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या संदर्भात पंचनामे करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. यात सर्वाधिक नुकसान हे पुरंदर आणि इंदापूर तालुक्यांत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर जिल्ह्यातील भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस पडतो आहे. त्यामुळे काही तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात १८ आणि १९ तारखेला अवकाळी पावसाचा जोरदार फटका आठ तालुक्यांतील पिकांना बसला. त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, भोर, दौंड, इंदापूर, राजगड, शिरूर आणि बारामती या आठ तालुक्यांतील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, काकडी, कलिंगड, हरभरा, केळी, चारापिके, फुलपिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये ६९ गावांमधील ३६८२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. इंदापूरमध्ये सर्वाधिक १२६९ शेतकऱ्यांचे ६४६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ पुरंदर तालुक्यात १२८३ शेतकऱ्यांच्या ३८९.८० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. वेल्हा, दौंड, शिरूर, बारामती या चार तालुक्यांमध्ये अत्यल्प प्रमाणात नुकसान झाले आहे.


