महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे १४५ ठिकाणी पाणी साचणे, घरात-दुकानात पाणी शिरणे आणि २१ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी आल्या. तेथे संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत तातडीने मदत पुरवली गेली. नुकसान झालेल्या ठिकाणी तातडीने पंचनामा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात आली. परिमंडळ उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात अग्निशमन दल, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन आदी विभागांचे कर्मचारी आवश्यक त्या साधनसामग्रीसह कार्यरत होते. सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक आपत्ती व्यवस्थापन कक्षात घेण्यात आली. महापौर मंजूषा नागपुरे व आयुक्त नवलकिशोर राम यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे; तसेच पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्याविषयी सूचना केल्या. नागरिकांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी ०२०-२५५०१२६९, ०२०-२५५०६८०० या क्रमांकावर संपर्क साधावा, हा कक्ष चोवीस तास कार्यान्वित असेल, असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
अवघ्या एक दीड तासाच्या मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी शहराला शब्दशः झोडपून काढले. पश्चिम-पूर्व; तसेच दक्षिण उपनगरांमध्ये घरात पाणी शिरले. यामुळे नागरिक हतबल झाले होते.
दुपारपासूनच अंधारून आले होते. अडीचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढला. समोरचे काही दिसणार नाही, इतका पावसाचा जोर होता. काही वेळातच रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. सखल भागात पाणी साचले. रस्त्यांना नदीचे रूप आले. कोथरूडचा महर्षी कर्वे पुतळा, कर्वे रस्ता, कचरा डेपो परिसर, टिळक चौक, शास्त्री रस्ता, महापौरांचा प्रभाग असलेला सिंहगड रस्ता, हिंगणे, साईनगर, खोराड वस्ती, दामोदरनगर, मोरे चौक आदी ठिकाणी पाणी साचले.
कोथरूड कचरा डेपो समोर रस्त्याला नदीचे स्वरूप येऊन प्रचंड वेगाने पाण्याचे लोट वाहत होते. कमरेइतक्या पाण्यात वाहने अडकली होती. काही दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले. मध्यवर्ती पेठांमध्येही पावसाचा जोर कायम होता.
आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) नव्यानेच उद्घाटन करण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलावरून पावसाचे पाणी थेट खालून जाणाऱ्या वाहनांवर व पादचाऱ्यांवर पडत होते. उड्डाणपुलाशी संबंधित समस्यांबाबत नगरसेवक सनी निम्हण यांनी यापूर्वीच जाब विचारला होता. मात्र, प्रशासनाकडून सुधारणा झाली नाही.


