उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात अधिकारी ( ओएसडी ) असल्याचे भासवून तोतयागिरी करणाऱ्या व्यक्तीचा प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, प्रशासनाची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रयत्न समोर आला आहे. या प्रकरणी तोतया व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि नोटीस देऊन सोडले.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रद्युम्न पाटील (वय ४७, रा. हिंजवडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपण उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ‘ओएसडी’ (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणून कार्यरत असल्याचे खोटे भासवले. प्रत्यक्षात त्याचा कोणताही संबंध त्या कार्यालयाशी नसताना त्याने स्वतःची ओळख लपवून अधिकृत पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार परिमंडळ एक उपायुक्तांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी पदांचा गैरवापर करून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. अशा तोतयागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
समर्थ पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये सॉफ्टवेअरसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या मित्राकडून त्याची ओळख पाटील याच्याशी झाली होती. पाटीलने स्वतःला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी असल्याचे सांगितले होते. तक्रारदाराचे न्यायप्रविष्ट प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवतो व नुकसानभरपाई मिळवून देतो, असे आमिष दाखवले होते. त्याचा मोबदला म्हणून रकमेच्या दहा टक्के कमिशनची मागणी केली होती.


