फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आयटी ॲक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत. या प्रकरणी साळुंखे विहार येथे राहणाऱ्या ८२वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आहेत. हा प्रकार १९ ऑक्टोबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ या काळात घडला.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, १९ ऑक्टोबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तक्रारदाराकडून वेळोवेळी एकूण एक कोटी एक लाख ६१ हजार ८४५ रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्स्फर करून घेण्यात आले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.
ऑनलाइन फसवणूक
शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका आयटी व्यावसायिकाची ४९ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार लोहगाव परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमोल सुरेश चौधरी (वय ३५) यांनी तक्रार दिली असून, यूट्यूब लिंकद्वारे संपर्क साधणारे अज्ञात व्यक्ती; तसेच शीतल मोगल-जगदाळे, हिमांश शर्मा आणि मंगल मोगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराला शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून विश्वासात घेतले. त्यानुसार तक्रारदाराकडून वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये एकूण ६३ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेतले. या गुंतवणुकीच्या बदल्यात आरोपींनी केवळ १३ लाख १५ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम परत न करता टाळाटाळ केल्याने अखेरीस फसवणूक केल्याचे उघड झाले.


