पुणे : शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर पुणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मध्यवर्ती भागाला याचा सर्वाधिक फटका बसला.
सिंहगड रस्ता, कात्रज, स्वारगेट, डेक्कन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाणेर, औंध, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी, हडपसर या भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. १६ ठिकाणी पाणी साचल्याने आणि २८ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने कोंडीत भर पडली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कार्यालयीन वेळेत पावसाचा जोर वाढल्याने नोकरदार वर्ग अडकला. काही नागरिकांना अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसला. अनेक सिग्नल यंत्रणांवरही परिणाम झाल्याने वाहतूक नियंत्रणात अडचणी निर्माण झाल्या.


