शहराला गुरुवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने झोडपले. अवघ्या साडेतीन तासांत ८२ झाडे कोसळली. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे रस्ता परिसरात (सिंहगड रस्ता) झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक ठिकाणी वाहनांचे आणि इमारतींच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले.
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे दुपारी अडीच ते सायंकाळी सहा या वेळेत झाडपडीच्या ८२ घटनांची नोंद झाली होती. पाणी साचण्याच्या सहा आणि भिंत कोसळण्याच्या एका घटनेची नोंद झाली होती. झाडे व भिंती कोसळल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सिंहगड रस्ता परिसरातील नवश्या मारुती मंदिराजवळ वटवृक्ष उन्मळून पडला. यासह वानवडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, बाणेर, औंध, बिबवेवाडी, गंगाधाम, जनता वसाहत, कोरेगाव पार्क, कोंढवा, कात्रज, वारजे, पाषाण, ससाणेनगर आदी भागांत झाडे कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. वारजे, रविवार पेठ, सॅलिसबरी पार्क आणि पाटील प्लाझा परिसरात पाणी घरांमध्ये शिरल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या.
कोंढवे धावडे येथील भीमनगर परिसरात एका इमारतीच्या टेरेसवरील लोखंडी पत्र्याचे छत वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर कोसळले. अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करीत अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत केली. यासारखीच दुर्घटना कोंढवा बुद्रुक येथे घडली. येथे व्हीआयआयटी संस्थेजवल एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी लावलेले पत्रे वाऱ्याने रस्त्यावर पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली २० अग्निशमन गाड्या, दोन रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे १०० जवान घटनास्थळी कार्यरत होते. रात्री आठपर्यंत ८२ पैकी ५२ ठिकाणी पडलेली झाडे बाजूला करण्यात आली होती. उर्वरित ठिकाणी उशिरापर्यंत काम सुरू होते.


