पुणे : पुण्यात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वीज वितरण यंत्रणेला बसला असून, वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने विविध भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.
कोथरूड : कुंदनगरी फीडरवर विजेला अटकाव करणारी यंत्रणा बाधित झाली. पर्यायी मार्गाने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. नांदेडसिटी अतिउच्चदाब वाहिनीवर ट्रिपिंग आल्यामुळे बाधित झालेला कोथरूड विभागातील वीजपुरवठा अर्ध्या तासात सुरळीत केला.
शिवाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, खडकी, बावधन, बाणेर, शिवाजी हाउसिंग सोसायटी परिसरातील वीज वाहिन्यांचा पुरवठा बाधित झाला होता. त्यापैकी विद्यापीठ वाहिनी सुरू करण्यात यश मिळाले.
पिंपरी/भोसरी : या भागातील रावेत २२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ५८ रोहित्रे बंद पडली आहेत. त्यांना पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरण कर्मचारी करीत होते.
पर्वती : जुन्या पर्वती वीज उपकेंद्रातील फीडरवर झाड पडले. हे झाड हटवून वीजपुरवठा सुरु करण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रयेजा व मधुकोश वाहिनीच्या इनकमिंग फीडर बॉक्स भागात पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे.
बंडगार्डन : वडाची वाडी या ओव्हरहेड वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने त्या भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. वाडिया वाहिनीला तासाभरातच पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आले.
रास्ता पेठ : कोंढवा, येवलेवाडी या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीवर परिणाम झाल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता.


