या परिसरातील सार्वजनिक उद्यानांच्या अभावाचा मुद्दा फाउंडेशनने लावून धरला होता. रहिवाशांच्या एकजुटीतून फाउंडेशनने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे, उंड्रीतील तीन एकर जागेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या गौरवार्थ ‘सिंदूर स्मृती वाटिका’ उभारण्याची घोषणा पुणे महापालिकेने केली आहे. यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूदही करण्यात आली आहे.
पुणे : निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या महंमदवाडी आणि उंड्री परिसरात मागील दोन दशकांत नागरीकरण झपाट्याने वाढले. मात्र, २०१७ मध्ये पुणे महापालिकेत समावेश होऊनही हा परिसर विकासाच्या प्रतीक्षेतच आहे. अशा वेळी मूलभूत-पायाभूत सोयीसुविधांची वानवा आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात लोकशक्ती उभी राहिली ती ‘महंमदवाडी उंड्री रेसिडेंट्स वेल्फेअर डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या रूपाने. केवळ तक्रारींचा पाढा न वाचता या संस्थेचे साडेसातशेहून अधिक सभासद कृतिशील उपक्रमांतून परिसराचा कायापालट करण्यासाठी झगडत आहेत.
महंमदवाडी, उंड्री, कडनगर, पिसोळी, हांडेवाडीचा परिसर छोट्या-मोठ्या टेकड्यांच्या छायेत वसलेला असून, हिरवीगार शेती आणि समृद्ध वनराईने नटलेला आहे. पुणे महानगराच्या विस्तारामुळे गेल्या काही वर्षांत या परिसरात विकासाच्या पाऊलखुणा उमटू लागल्या. आयटी पार्क, एमआयडीसीतील औद्योगिक कंपन्यामध्ये नोकरी करणाऱ्या बहुभाषिक नोकरदारांना महंमदवाडी, उंड्री परिसर वास्तव्यासाठी खुणावू लागला. या परिसरातील जमिनींचे दर कमी असल्याने बांधकाम व्यावसायिक आकर्षित झाले. त्यांनी टोलेजंग इमारतींच्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या उभारल्या. मात्र, वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव होता. या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वी वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरांसारख्या सामाजिक कार्यासाठी ‘महंमदवाडी उंड्री रेसिडेंट्स वेल्फेअर डेव्हलपमेंट फाउंडेशन’ स्थापन करून एकजूट झालेल्या नागरिकांनी आता नागरी समस्यांसाठी एल्गार पुकारला आहे. या फाउंडेशनचे अकरा संचालक आणि साडेसातशेहून अधिक सभासद आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी वेळ देत आहेत. पन्नासहून अधिक सोसायट्यांचे प्रतिनिधित्व करणारी ही संघटना या परिसराचा आवाज झाली आहे.
या परिसरातील अनेक सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. खड्डेमय रस्ते, पदपथांचा अभाव, सांडपाणी वाहिन्यांचे अपुरे जाळे, मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे, अनियंत्रित बांधकामे आणि रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पातून उडणारी धूळ यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या समस्या सोडवण्यासाठी फाउंडेशनतर्फे महापालिका आणि जिल्हा प्रशासनासह संबंधित सरकारी प्राधिकरणांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जातो. अपघातमुक्त रस्ते, पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा आदी प्रश्नांवर फाउंडेशनच्या सभासदांनी रस्त्यावर उतरून आंदोलने, मानवी साखळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
‘फाउंडेशनच्या या पाठपुराव्याला आता यश येऊ लागले आहे. सभासदांच्या प्रयत्नांमुळे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी महंमदवाडी, उंड्री परिसराची पाहणी करून विकासकामांना गती दिली. उंड्रीतील अनेक खासगी रस्ते पालिकेच्या ताब्यात आले असून, त्यांची दुरुस्ती व पदपथांची कामे मार्गी लागली आहेत. कडनगर येथील धोकादायक वीजयंत्रणा हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पथदिव्यांमुळे रस्ते प्रकाशमान होत आहेत. उंड्री रस्त्यावरील उन्नत रस्त्यांच्या रखडलेल्या कामाला गती मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गृह विभागाच्या निधीतून सात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे,’ असे फाउंडेशनचे संचालक सुनील कलोटी यांनी सांगितले.

