जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने विशेषत: बागलाण आणि सिन्नर या दोन तालुक्यांना झोडपून काढले. या दोन्हीही तालुक्यातील शेतीपिकांना या पावसाचा मोठा फटका बसला. या तालुक्यांमध्ये सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रामुख्याने कांदा, गहू, भाजीपाल्यासह डाळिंब व द्राक्षासारख्या वेलवर्गींय फळांनाही फटका बसला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका सटाणा आणि सिन्नर तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यातील एकूण ३,०३३ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
जिल्ह्यातील एकूण १८ गावांमधील ४,३१७ शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामध्ये एकट्या सटाणा तालुक्यातील ४,२६४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
सातारा : जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून, मेढ्यात गांधीनगर येथे एका घरावर झाड कोसळून नुकसान झाले. काही भागांत वीज पुरवठा खंडित झाल्याचीही माहिती मिळत आहे. काही ठिकाणी किरकोळ नुकसानही झाल्याची माहिती समोर आली आहे. काही भागांत विजांचा कडकडाट इतका तीव्र होता, की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


