पुणे : लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्याची दुचाकी जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना वडगाव शेरी गावठाण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत, कल्याण विठ्ठल भापकर (वय २१, रा. आनंद पार्क, वडगावशेरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, आकाश पायगुडे आणि आतिष डिंगरे (दोघे रा. विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास वडगाव शेरी गावठाणातील लोणकर शाळेच्या पाठीमागे सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ घडली. तेथे तक्रारदार भापकर लघुशंकेसाठी गेले असताना, त्यांचा मित्र जितू चावरीया यांना आरोपींनी लोखंडी हत्याराचा धाक दाखविला; तसेच तक्रारदारांच्या परिचयाच्या प्रसाद ससाणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर तक्रारदारांची दुचाकी घेऊन आरोपींनी पोबारा केला, असे तक्रारीत नमूद आहे.


