चंडीगड : निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेच्या (एसआयआर) वेळापत्रकाबाबत अधिसूचना येण्याच्या अपेक्षेने पंजाबमध्ये ‘एसआयआर’साठी सर्व पूर्वतयारीचे उपक्रम नियोजनबद्ध आणि कालबद्ध पद्धतीने सुरू असून राज्य सज्ज होत आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
फेब्रुवारीत निवडणूक आयोगाने पंजाबसह २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एसआयआरशी संबंधित पूर्वतयारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी अनिंदिता मित्रा म्हणाल्या, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘ एसआयआर मॅपिंग ’ हाती घेण्यात आले आहे. चार एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पंजाबमधील ७४.२७ टक्के मतदारांचे ‘मॅपिंग’ पूर्ण झाले आहे.


