‘ आर्टेमिस २ ’ मोहिमेत यानाचा चंद्राच्या दिशेने अर्ध्याहून अधिक प्रवास पूर्ण झाला असून, यानातील अंतराळवीर आता त्यांच्या चंद्राभोवतीच्या ऐतिहासिक फेरीसाठी सज्ज झाले आहेत. या मोहिमेद्वारे ते अपोलो मोहिमेमधील अंतराळवीरांपेक्षाही अधिक अंतराचा प्रवास करणार आहेत.
या मोहिमेत तीन अमेरिकन आणि एक कॅनेडियन अंतराळवीर असून, ते सोमवारपर्यंत चंद्राजवळ पोहोचणार आहेत. ते चंद्राच्या दूरवरच्या गूढ भागाचे छायाचित्रण करून त्याभोवती फेरी मारतील. ५३ वर्षांहून अधिक काळानंतर चंद्राच्या कक्षेत जाणारी ही पहिली मानव मोहीम आहे.
‘पृथ्वी आता खूप लहान दिसते आहे आणि चंद्र निश्चितच मोठा होताना दिसतो आहे,’ असे पायलट व्हिक्टर ग्लोव्हर यांनी सांगितले.
मात्र, एक अडचण अशी आहे ओरायन अवकाशकुपीचे शौचालय पुन्हा एकदा बिघडले आहे. ‘ नासा ’च्या मिशन कंट्रोलने शौचालय दुरुस्त होईपर्यंत अंतराळवीरांना पर्यायी मूत्र संकलन पिशव्या वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी प्रक्षेपणानंतर हे ‘लुनर लू’ बिघडले असून, ते अधूनमधूनच कार्यरत आहे.
शौचालयाच्या या प्रकाराची काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात चाचणी करण्यात आली होती. अभियंत्यांच्या मते, बर्फ साचल्यामुळे मूत्र पूर्णपणे बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत असावा. मात्र इतर आवश्यक वापरासाठी शौचालय कार्यरत आहे.
व्यवस्थापन पथकाचे प्रमुख जॉन हनीकट यांनी सांगितले, की ‘सध्या शौचालय ‘ठीक’ अवस्थेत असले तरी ते पूर्ण क्षमतेने कार्यरत असावे अशी अपेक्षा आहे. अंतराळवीर ठीक आहेत. त्यांनी अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.’
दहा दिवसांची ही मोहीम १० एप्रिल रोजी पॅसिफिक महासागरात स्प्लॅशडाउनसह संपणार आहे. ही मोहीम चंद्रावर तळ उभारण्याच्या ‘नासा’च्या महत्त्वाकांक्षी योजनेतील पहिला टप्पा आहे.



