‘बेंगळुरू   ’च ‘धुरंधर’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जवर ४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत २५० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ २०७ धावांत सर्वबाद झाला. बेंगळुरूचा हा सलग दुसरा विजय ठरला.

‘बेंगळुरू   ’च ‘धुरंधर’

टिम डेव्हिडसह रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या फलंदाजांनी आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई करून ३ बाद २५० धावांपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना ‘चेन्नई’चा डाव १९.४ षटकांत २०७ धावांत आटोपला. ‘बेंगळुरू’ने ही लढत ४३ धावांनी जिंकली. ‘बेंगळुरू’चा हा सलग दुसरा विजय, तर ‘चेन्नई’चा सलग दुसरा पराभव ठरला.

एम. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये ही लढत झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना ‘चेन्नई’च्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. संजू सॅमसन (९), ऋतुराज गायकवाड (७) आणि आयुष म्हात्रे (१) बाद झाले तेव्हा ‘चेन्नई’ची २.५ षटकांत ३ बाद ३० अशी स्थिती झाली होती. कार्तिक शर्मालाही (६) छाप पाडता आली नाही. सर्फराझ खानने २५ चेंडूंत आठ चौकार व दोन षटकारांसह ५०, तर प्रशांत वीरने २९ चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह ४३ धावा केल्या. यानंतर जेमी ओव्हरटननेही फटकेबाजी केली. त्यामुळे ‘चेन्नई’ला दोनशे धावांचा टप्पा ओलांडण्याचे समाधान लाभले.

तत्पूर्वी, ‘चेन्नई’ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. विराट कोहलीला सात धावांवर असताना शिवम दुबेकडून जीवदान मिळाले होते. मात्र, या जीवदानाचा त्याला फायदा घेता आला नाही. पाचव्या षटकात अंशुल कम्बोजने कोहलीला बाद केले. कोहलीने १८ चेंडूंत दोन चौकार व एका षटकारासह २८ धावा केल्या. यानंतर देवदत्त पडिक्कलने सॉल्टसह दुसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ५६, तर रजत पाटीदारसह २१ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. फिल सॉल्टला अर्धशतक पूर्ण करता आले नाही, तर पडिक्कल अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. सॉल्टने ३० चेंडूंत तीन चौकार व दोन षटकारांसह ४६ धावा केल्या. पडिक्कलने २९ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह ५० धावा केल्या. पडिक्कलचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. या वेळी ‘बेंगळुरू’ने १४.१ षटकांत ३ बाद १५१ धावा केल्या होत्या. यानंतर टिम डेव्हिड आणि पाटीदारने ‘चेन्नई’च्या गोलंदाजांची धुलाई केली. ‘बेंगळुरू’ने अखेरच्या पाच षटकांत (३० धावांत) ९७ धावा कुटल्या. पाटीदार आणि डेव्हिड यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची अभेद्य (३६ चेंडू) भागीदारी केली. डेव्हिडने २५ चेंडूंत आठ षटकार व तीन चौकारांसह नाबाद ७०, तर पाटीदारने १९ चेंडूंत सहा षटकार व एका चौकारासह नाबाद ४८ धावा केल्या. ‘बेंगळुरू’च्या फलंदाजांनी एकूण १९ षटकार व १४ चौकार तडकावले.

संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - २० षटकांत ३ बाद २५० (फिल सॉल्ट ४६, विराट कोहली २८, देवदत्त पडिक्कल ५०, रजत पाटीदार नाबाद ४८, टिम डेव्हिड नाबाद ७०, खलील अहमद ४-०-३७-०, मॅट हेन्री ३-०-३६-०, अंशुल कुम्बोज ४-०-५२-१, नूर अहमद ४-०-४९-०, जेमी ओव्हरटन ३-०-४२-१, शिवम दुबे २-०-३०-१) वि. वि. चेन्नई सुपर किंग्ज - १९.४ षटकांत सर्व बाद २०७ (सर्फराझ खान ५०, शिवम दुबे १८, प्रशांत वीर ४३, जेमी ओव्हरटन ३७, अंशुल कम्बोज नाबाद १९, जेकब डफी ४-०-५८-२, भुवनेश्वरकुमार ४-०-४१-३, अभिनंदन सिंह ३.४-०-३०-२, कृणाल पंड्या ३-०-३६-२, सुयश शर्मा ४-०-२१-१, रोमारिओ शेफर्ड १-०-१९-०).