अमेरिकी लढाऊ वैमानिकाची इराणमधून सुटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इराणमधून एका अमेरिकी लढाऊ वैमानिकाची यशस्वी सुटका झाली. विमान पाडल्यानंतर तो डोंगरात लपला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बचावकार्याचे कौतुक केले. इराणने मात्र ही मोहीम उधळल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये काही जणांचा मृत्यू झाला असून इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. दुबईतील ओरॅकलच्या कार्यालयालाही लक्ष्य करण्यात आले.

iran secures the safe rescue of us fighter pilot

इराणने लक्ष्य केलेल्या अमेरिकी लढाऊ विमानाच्या वैमानिकाची रोमहर्षकरित्या सुटका करण्यात आली. विमान पाडण्यात आल्यानंतर हा वैमानिक शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डोंगरातील एका खडकाच्या फटीत लपून बसला होता. तसेच, नंतर त्याने डोंगरावर तब्बल सात हजार फुटांपर्यंत चढाई केल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. इराणने या वैमानिकाला पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते.

या वैमानिकाच्या बचावकार्यात सर्वांनी दाखवलेले शौर्य आणि कौशल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कौतुक केले. ‘‘एफ-१५’च्या गंभीर जखमी झालेल्या शूर वैमानिकाची इराणच्या डोंगरांमधून सुटका करण्यात आली. इराणी सैन्य मोठ्या संख्येने कसोशीने त्याचा शोध घेत होते आणि जवळ येत होते,’ असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सुटका करण्यात आलेल्या वैमानिकाचा त्यांनी अत्यंत प्रतिष्ठित कर्नल असा उल्लेख केला आहे.


अमेरिकी लढाऊ वैमानिकाची इराणमधून सुटका

‘माणसे आणि साधनसामग्रीला असलेल्या धोक्यामुळे या प्रकारची कारवाई क्वचितच केली जाते. असे सहसा घडत नाही! आम्ही भरदिवसा वैमानिकाची सुटका केली. हे असामान्यच होते. सर्वांनी या मोहिमेत अद्भुत शौर्य आणि कौशल्य दाखवले,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मोहीम उधळल्याचा इराणचा दावा

वैमानिकाची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले असतानाच, या वैमानिकाला वाचवण्यासाठी राबवण्यात आलेली मोहीम पूर्णपणे उधळून लावण्यात आल्याचा दावा इराणने रविवारी केला. अर्थात, या वैमानिकाला ताब्यात घेतल्याचा उल्लेख इराणने केलेला नाही. ‘पाडलेल्या विमानाच्या वैमानिकाच्या सुटकेसाठी दक्षिण इस्फहानमधील एका निर्जन विमानतळावर राबवण्यात आलेली अमेरिकी लष्करी बचाव मोहीम पूर्णपणे उधळून लावण्यात आली’, असे लष्कराच्या केंद्रीय कमांड खातम अल-अंबियाचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फगारी यांनी नमूद केले.

पाच प्राध्यापक, ६० विद्यार्थ्यांचा मृत्यू

इराणच्या नैऋत्य भागात झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच विद्यापीठांतील प्राध्यापक, ६० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका इराणी अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, इराणविरोधातील आक्रमकता वाढल्यास या प्रदेशात अमेरिकी लष्कराने वापरलेल्या सर्व पायाभूत सुविधा; तसेच इस्रायलच्या पायाभूत सुविधांना इराण लक्ष्य करील, असा इशारा संयुक्त लष्करी कमांडचे कमांडर जनरल अली अब्दोल्लाही अलियाबादी यांनी दिला आहे.

ओरॅकलच्या कार्यालयाची हानी

इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या धमकीनंतर, ओरॅकल या तंत्रज्ञान कंपनीचे दुबई येथील कार्यालय लक्ष्य करण्यात आले. इमारतीच्या एका कोपऱ्याला मोठे भगदाड पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. टेक्सासस्थित ओरॅकल कॉर्पने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.