रशियाच्या एलिना नेपली हिने महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा झाली. चौथ्या मानांकित एलिना नेपली हिने बोस्निया- हर्झेगोव्हिनाच्या १६ वर्षांच्या टिया कोवासेविकचा ६-२, ६-१ असा सहज पराभव केला. ही लढत एक तास १६ मिनिटे चालली. पहिल्या सेटमध्ये एलिनाने टियाची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-२ असा जिंकला. दुसरा सेट अगदीच एकतर्फी झाला. एलिनाला आव्हान देण्याची टियाची क्षमताच नसल्याचे जाणवले. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आठव्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर नवव्या गेममध्ये एलिनाने टियाची सर्व्हिस भेदली आणि हा सेट ६-१ असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेत विजेत्या खेळाडूला करंडक, दोन हजार ११६ डॉल व १५ गुण, उपविजेतीस करंडक, एक हजार ३२३ डॉलर व १० गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत (आयएएस) यांच्या हस्ते झाले.



