पुण्याच्या मुलींना विजेतेपद

महाराष्ट्र टाइम्स

पुण्याच्या मुलींनी १८ वर्षांखालील आंतरराज्य बास्केटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत त्यांनी उत्तर मुंबई संघाचा ५९-२८ असा पराभव केला. वैष्णवी परदेशीला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत पुणे संघाने उत्कृष्ट खेळ दाखवला. मध्य मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला.

pune girls won the inter state basketball tournament championship

पुण्याच्या मुलींनी १८ वर्षांखालील गटाच्या आंतरराज्य बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत पुण्याच्या मुलींनी उत्तर मुंबई संघावर मात केली. वैष्णवी परदेशीला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

नाशिक येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत पुणे संघाने उत्तर मुंबईवर ५९-२८ अशी सहज मात केली. मध्यंतरालाच ३६-१३ अशी मोठी आघाडी घेऊन पुण्याच्या मुलींनी अर्धी लढाई जिंकली होती. उत्तरार्धातही मुंबईच्या संघाकडून फारसे काही घडले नाही. पुणे संघाकडून वैष्णवी परदेशी (१३), सिया भोसले (१०), रेवा कुलकर्णी (१०) यांनी चांगली कामगिरी केली. मुंबईकडून रुची सावंत (११), वेदान्ती जोशी (७) यांनी चमक दाखवली. यानंतर मध्य मुंबईने सातारा संघावर ४६-४५ अशी एका गुणाने मात करून तिसरा क्रमांक मिळवला. ही लढत अखेरपर्यंत चुरशीची झाली.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीत पुणे संघाने सातारा संघावर ७८-३० अशी सहज मात केली. मध्यंतरालाच पुणे संघाकडे ४२-१७ अशी आघाडी होती. पुण्याच्या विजयात आर्या फटांगरे (१८) आणि वैष्णवी परदेशी (१२) यांनी मोलाचा वाटा उचलला, तर साताराकडून तन्वी जाधव (७), नायला इनामदार (६) यांनी अधिक गुणांची कमाई केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत उत्तर मुंबई संगाने मध्य मुंबईवर ४५-३७ अशी मात केली होती. विजेत्यांना महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद कृ्ष्णन मथूकुमार, समाजसेवक अनुप राजुरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.