महंमद शमीने आपल्या क्षमतेची जाणीव राष्ट्रीय निवड समितीस करून देताना चार षटकांत अवघ्या नऊ धावांत दोन फलंदाज टिपले. त्याच वेळी सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतलेल्या कर्णधार ऋषभ पंतने आक्रमकतेस काहीशी मुरड घालून दमदार अर्धशतक केले. या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल टी-२० क्रिकेटमधील पहिला विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादला पाच विकेट राखून पराभूत केले.
शमीने १८ निर्धाव चेंडू टाकून त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. एवढेच नव्हे, तर त्याने ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या ‘हैदराबाद’च्या स्फोटक सलामीवीरांना बाद केले. त्यातून पूर्ण सावरणे न जमलेल्या ‘हैदराबाद’ला ९ बाद १५९ धावाच करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना एडन मार्करम याने २७ चेंडूंत ४५ धावा फटकावत ‘लखनौ’ला जोरदार सुरुवात करून दिली. त्यानंतर ऋषभ पंतने संघाचा विजय निश्चित होईपर्यंत मैदान सोडले नाही. अखेरच्या षटकांत नऊ धावांची गरज असताना ऋषभने तीन चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यातील एक तर टेनिसमधील ‘फोरहँड’च्या फटक्याची आठवण करून देणारा होता. चेंडू कमी वेगाने येणाऱ्या खेळपट्टीवर ‘हैदराबाद’चे फिरकी गोलंदाज पूर्ण वर्चस्व मिळवणार नाहीत ही काळजी ऋषभने घेतली.
तत्पूर्वी, ‘लखनौ’ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. शमीच्या हादऱ्यातून ‘हैदराबाद’ सावरण्यापूर्वीच ईशान किशन आणि लियाम लिव्हिंगस्टोन परतले होते. हेन्रीच क्लासेन आणि नितीशकुमार रेड्डीने ६३ चेंडूंत ११६ धावांचा चोप दिला. मात्र, ४ बाद १४२वरून ‘हैदराबाद’ची पुन्हा घसरण झाली. पंतने आयुष बदोनीसह २५, अब्दुल समादसह ३४, मयांक चौधरीसह नाबाद २१ धावांची भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक : सनरायझर्स हैदराबाद - २० षटकांत ९ बाद १५६ (ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा ०, ईशान किशन १, हेन्रीच क्लासेन ६२ (४१ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार), नितीशकुमार रेड्डी ५६ (३३ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार), महंमद शमी ४-०-९-२, दिग्वेश राठी ४-०-४६-१, प्रिन्स यादव ४-०-३४-२, मनीमारन सिद्धार्थ ४-०-२९-१, आवेश खान ४-०-३६-२) पराभूत वि. लखनौ सुपर किंग्ज - १९.५ षटकांत ५ बाद १६० (एडन मार्करम ४५ (२७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकार), मिचेल मार्श १४, ऋषभ पंत नाबाद ६८ (५० चेंडूंत ९ चौकार), आयुष बदोनी १२, निकोलस पूरन १, अब्दुल समद १६, हर्ष दुबे ४-०-१८-२, नितीशकुमार रेड्डी १-०-१४-०, जयदेव उनाडकट ४.५-०-५०-०, एशान मलिंगा ४-०-३०-१, शिवांगकुमार ४-०-३०-१).


