‘युद्धामुळे युक्रेनच्या मदतीत कपात’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

युक्रेनचे अध्यक्ष व्लजिमिर झिलेन्स्की यांनी चिंता व्यक्त केली आहे की इस्रायल आणि इराणमधील दीर्घकालीन युद्धामुळे अमेरिकेचे जागतिक प्राधान्यक्रम बदलू शकतात. यामुळे युक्रेनला मिळणाऱ्या लष्करी मदतीत, विशेषतः पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेच्या पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आहे. रशियाविरुद्धच्या लढाईसाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे. इराणमधील युद्ध लांबल्यास युक्रेनला मिळणारी मदत कमी होईल असे त्यांनी म्हटले आहे.

risk of decrease in military aid to ukraine

इस्तंबूल : इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन युद्धामुळे अमेरिकेचे जागतिक प्राधान्यक्रम बदलू शकतात, ज्याचा थेट परिणाम युक्रेनला मिळणाऱ्या लष्करी मदतीवर होऊ शकतो, अशी भीती युक्रेनचे अध्यक्ष व्लजिमिर झिलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे.

‘असोसिएटेड प्रेस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला मिळणाऱ्या ‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेच्या पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. झिलेन्स्की म्हणाले की, ‘रशियाकडून दररोज होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनला अमेरिकन बनावटीच्या ‘पॅट्रियट’ यंत्रणेची नितांत गरज आहे. आज आम्ही जगाच्या प्राधान्यक्रमात नाही, हे आम्हाला मान्य करावे लागेल. इराणमधील युद्ध जितके लांबेल, तितकी युक्रेनला मिळणारी मदत कमी होत जाईल,’ असे त्यांनी नमूद केले.