‘लेह विमानतळावरूनआता दररोज १८ विमाने’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लेह विमानतळावर विमानांची संख्या वाढली आहे. पर्यटनाच्या हंगामासाठी हवाई संपर्क मजबूत केला जात आहे. दिल्लीत रुग्णालयातील औषधांची बेकायदेशीर विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. जम्मूमध्ये अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली. आंध्र प्रदेशात ऑनर किलिंग प्रकरणी एका पोलीस निरीक्षकाला निलंबित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्रेडिट स्कोअर नकारात्मक असणाऱ्या व्यक्तीच्या प्रकरणी बँकांकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

leh airport to operate 18 flights daily starting today

लेह : पर्यटनाच्या मुख्य हंगामापूर्वी हवाई संपर्क बळकट करण्याच्या उद्देशाने लेह विमानतळावरील विमानांची संख्या दररोजच्या ८ वरून १८ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी रविवारी दिली.

रॅकेट उघडकीस

नवी दिल्ली : रुग्णालयांमध्ये शासनाकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणारे एक रॅकेट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले असून, ७० लाखांची औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात कार्यरत एक औषधनिर्माता व एक कंत्राटी मदतनीस यांच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली.

ड्रग्ज तस्कर अटकेत

जम्मू : रियासी, पूंछ आणि जम्मू जिल्ह्यांमध्ये सहा तस्करांना अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. रियासी जिल्ह्यातील कटरा शहराजवळील ‘पुराना दारूर’ बाजारपेठेत अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे दर्शवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

पोलिस निलंबित

माचेर्ला : आंध्र प्रदेशमधील पालनाडू जिल्ह्यातील माचेर्लाअंतर्गत येणाऱ्या एका गावात एका महिलेच्या 'ऑनर किलिंग'मध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून एका पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. ‘ऑनर किलिंग’ प्रकरणातील सहभाग व पीडित महिलेच्या कुटुंबाशी संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याच्या संशयावरून संबंधित पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

स्पष्टीकरण मागवले

नवी दिल्ली : कोणतेही कर्ज थकीत नसताना किंवा पेमेंटमध्ये कसलीही चूक केलेली नसतानाही, ज्याचा क्रेडिट स्कोअर अनेक वर्षांपासून ‘नकारात्मक’ राहिला होता, अशा व्यक्तीच्या मदतीला सर्वोच्च न्यायालय धावून आले आहे. न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर उत्तराखंडचे रहिवासी राजेंद्र सिंह पनवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी भारतीय स्टेट बँक आणि पीएनबी यांच्यासह प्रमुख बँकांकडून स्पष्टीकरण मागवले.