‘काळी जादू’ उलटवण्यासाठी दीड कोटी उकळले

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईतील एका व्यक्तीने ठाण्यातील एका कुटुंबाला काळी जादू उलटवण्याचे आमिष दाखवले. या भूलथापांना बळी पडून कुटुंबाने ऑनलाइनद्वारे तब्बल एक कोटी ६६ लाख रुपये दिले. आरोपीने जादूटोण्याबद्दल भीती दाखवून पैशांची मागणी केली. अखेर फसवणूक लक्षात आल्यानंतर कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

black magic scam exposed involving fraud of 15 crores

परिवारावर काळी जादू करण्यात आली आहे आणि ती उलटवण्यासाठी पूजा करावी लागेल, अशा भूलथापा मारून वेगवेगळ्या पूजाविधींच्या नावाखाली मुंबईतील एका व्यक्तीने ठाण्यातील कुटुंबाकडून ऑनलाइनद्वारे तब्बल एक कोटी ६६ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने जादूटोण्याबाबत सांगितलेल्या भयानक गोष्टींमुळे हे कुटुंब घाबरले आणि त्याच्या सांगण्यानुसार वागले. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात राहणाऱ्या चार जणांच्या या कुटुंबात तक्रारदार तरुणीसह तिचे आई-वडील आणि आजोबा यांचा समावेश आहे. मूळचे कर्नाटकचे असलेल्या या कुटुंबातील तरुणीच्या आईची आरोपीशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी त्यांच्या घरी आला. त्यावेळी तरुणीच्या आईने घरातील आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे सांगितले. त्यावर आरोपीने केरळमधील त्याच्या ओळखीचा एक पुजारी असल्याचे सांगितले. या पुजाऱ्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान असून तो नेहमी मुंबईत येत असल्याचेही त्याने सांगितले. हा पुजारी काही उपाय सांगेल, अशी खात्री आरोपीने दिली. त्यानंतर आरोपीने फोन करून तुमच्या एका जवळच्या नातेवाइकाने तुमच्यावर काळी जादू केली असून केरळमधील पुजारी ती जादू उलटवू शकतो, त्यामुळे तुमचे संरक्षण होईल आणि भविष्यात कोणताही त्रास होणार नाही, अशी बतावणी तक्रारदार आणि तिच्या आईला केली.

आरोपीने त्यांना बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर पुन्हा फोन करून तातडीने उपाय न केल्यास मोठे नुकसान होईल, तसेच वडिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही दाखवली. त्यामुळे आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुटुंब पूजाविधी करण्यास तयार झाले. आरोपीने पूजा करण्यासाठी केरळला जाण्याचा सल्ला दिला असला तरी कुटुंबाला ते शक्य नव्हते. यावर आरोपीने पूजेसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य लागणार असल्याचे सांगून सुरुवातीला दहा लाख रुपये उकळले. यानंतर आरोपीने जादूटोण्याविषयी आणखी भयानक गोष्टी सांगत, वडिलांच्या मैत्रिणीने काळी जादू केल्याचा आरोप केला. तसेच, स्वतःच्या न्यायालयीन प्रकरणांसाठीही पैशांची गरज असल्याचे सांगितले. जर पैसे दिले नाहीत तर तो न्यायालयीन केस हरू शकतो आणि त्याला कारागृहात जावे लागेल; परिणामी पूजा अर्धवट राहील आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही, अशीही भीती दाखवली.

या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईने आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये, तसेच आरोपी व त्याच्या आईच्या खात्यात एक कोटी ५६ लाख ५० हजार रुपये ऑनलाइनद्वारे पाठवले. एकूण एक कोटी ६६ लाख रुपये मिळाल्यानंतरही आरोपीकडून पैशांची मागणी सुरूच होती. अखेर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.