नवी दिल्ली : दोन हजारांहून अधिक तक्रारी आणि ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या फसवणुकीशी संबंधित एक मोठे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेट दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, कथित सूत्रधार आणि दहा अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटशी, विशेषतः कंबोडियातील गटांशी या रॅकेटचा संबंध असल्याचे आढळले आहे.
‘आतापर्यंत गुन्ह्यातून मिळालेला पैसा वळवण्यासाठी वापरल्या गेलेल्या शंभरहून अधिक बनावट कंपन्यांशी संबंधित २६०हून अधिक बँक खाती ओळखली आहेत. या रॅकेटशी संबंधित तक्रारींची एकूण संख्या दोन हजार ५६७ आहे,’ असे पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपी करण कजारियाला कोलकाता विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला एक दिवसानंतर दिल्लीत आणण्यात आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) आदित्य गौतम यांनी दिली.



