उलानबातार (मंगोलिया) : भारतीय महिला बॉक्सरचा आशियाई स्पर्धेतील धडाका मीनाक्षी आणि जस्मिनने रविवारी कायम राखला. मीनाक्षीने ४८ किलो गटाच्या स्पर्धेत जपानच्या युका सादामास्तूचा ५-० असा पराभव केला. जस्मिनने ५७ किलो गटात चीनच्या झी चेनला हरवले. आता भारताच्या सर्व दहा महिला बॉक्सरनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या स्पर्धेत सहा भारतीयांनी पदक निश्चित केले आहे.
कुस्ती स्पर्धा आजपासून
बिश्केक : भारतीय संघ आज, सोमवारपासून येथे सुरू होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत मोठ्या आत्मविश्वासाने उतरणार आहे. भारताचे नव्या दमाचे कुस्तीपटू नक्कीच चमक दाखवतील, अशी आशा आहे. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष ५३ किलो गटातील मीनाक्षी गोयत हिच्यावर असेल. तिने राष्ट्रीय चाचणीत दोन वेळा जागतिक पदक विजेती ठरलेल्या अंतिम पंघालला पराभूत केले आहे. पुरुषांच्या फ्री स्टाइल गटात अमन सेहरावत (६१ किलो) आणि सुजित कलकल (६५ किलो) पदकाचे प्रबळ दावेदार असतील.
महाराष्ट्राचा पराभव
राजगीर : महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रविवारी सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. मुलांच्या ‘अ’ गटात पंजाबने महाराष्ट्रावर २-०ने मात केली. पंजाबकडून संगतसिंग (१० मि.) आणि आकाशदीप (५३ मि.) यांनी गोल केले.
भारताचा पराभव
पथून थानी (थायलंड) : भारताच्या महिला संघाला आशिया कप फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला. दोन लढतींनंतरही भारताला गुणांचे खाते उघडता आलेले नाही. बुधवारी भारताची लढत चायनीज तैपेईविरुद्ध होईल.



