जमिनीच्या जुन्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका आणि त्यांच्या मुलावर चाकूने वार करून ठार मारले. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, लग्नावरून परतल्यानंतर वऱ्हाड चहा पिण्यासाठी जात असतानाच हा हल्ला करण्यात आला.
प्रभाकर भलमे (५५) आणि मुलगा रितेश भलमे (२५, रा. बरबडी) अशी मृतांची नावे आहेत. बरबडी येथील प्रभाकर यांच्या महिलाश्रम परिसरातील मित्राच्या मुलाचा लग्न सोहळा वायगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या लग्न सोहळ्यासाठी ते कुटुंबीयांसह लग्नाला गेले. लग्न आटोपून ट्रॅव्हल्सने परत आले. महिलाश्रम परिसरातून प्रभाकर हे मुलगा रितेश आणि वऱ्हाड्यांसह चहा घेण्यासाठी जात होते. याच सुमारास त्यांचा अल्पवयीन पुतण्या तिथे आला. काही कळायच्या आत सोबत आणलेल्या चाकूने प्रभाकर आणि रितेश या बापलेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्राच्या मुलाचे लग्न असल्याने प्रभाकर आनंदी होते. मात्र, पुतण्याने चाकूने वार करून बापलेकांना संपविल्याने आनंद ओसंडून वाहणारे घर दु:खात बुडाले. आनंदी सूर कानी पडणाऱ्या घरातून आक्रोश ऐकू येऊ लागला.



