महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा कडकपणे लागू केल्यानंतर आता तंत्र-मंत्राच्या नावाखाली होणारे धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या षडयंत्रांना रोखण्यासाठी सरकार कडक पावले उचलत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या राज्यात बहिणींची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि भविष्यातील सोहळ्यांची गरज लक्षात घेऊन नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कायमस्वरूपी जमिनींचे अधिग्रहण केले जाईल. या जमिनी कायमस्वरूपी ‘साधुग्राम’ म्हणूनच ओळखल्या जातील, जेणेकरून दर बारा वर्षांनी जमिनींचा सिंहस्थ कुंभासाठी प्रश्न उद्भवणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये रविवारी केली.
तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिराच्या नीलकंठ सभागृहात आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिराच्या श्री नीलकंठ सभागृहात देशभरातील संत-महंतांच्या उपस्थितीत ही परिषद झाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंहस्थाच्या औचित्यावर विविध विकासात्मक मुद्द्यांची मांडणी केली.
फडणवीस पुढे म्हणाले, ‘गेल्या सिंहस्थात आम्हाला फारसा वेळ मिळाला नव्हता; पण यंदा हाताशी मिळालेल्या वेळेचा उपयोग आम्ही नाशिक तीर्थाच्या विकासासाठी करीत आहोत. या औचित्याने शहरात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच आम्हाला प्रामुख्याने गोदावरी प्रदूषणमुक्त करायची आहे. गोदेवरील कुठेही मलमिश्रित किंवा सांडपाणी मिसळणार नाही, ही नदी बारमाही प्रवाहित राहील व त्र्यंबकच्या कुशावर्तातही सातत्याने ताजे पाणी प्रवाहित केले जाईल, यांसारख्या बाबींद्वारे तीर्थाचे पावित्र्य जपण्यावर आमचा भर आहे.’