पदोपदी थरारक क्षणांचा अनुभव

महाराष्ट्र टाइम्स

मुलुंड येथे महाराष्ट्र सेवा संघाने आयोजित केलेल्या साहसपट महोत्सवात थरारक साहसी क्षणांचे अनुभव प्रेक्षकांना मिळाले. लेह ते मनाली सायकल भ्रमंती, लोणावळ्याच्या ड्युक्स नोज येथील हायलाइन मेळावा आणि भैरवगडावरून बेस जंप यांसारख्या मोहिमांचे लघुपट सादर झाले. राज्यभरातील गिर्यारोहक आणि साहसवीरांनी यात भाग घेतला. या वीरांच्या धडाडीला उपस्थितांनी दाद दिली.

thrilling moments of adventure a captivating experience of the mulund adventure film festival

लेह ते मनाली या खडतर मार्गावर केलेली सायकल भ्रमंती, लोणावळ्याच्या ‘ड्युक्स नोज’ परिसरात काही तरुणींनी एकत्र येत साजरा केलेला हायलाइन मेळावा, भैरवगडावरून केलेली बेस जम्प... असे एक ना अनेक थरारक क्षण शनिवारी प्रेक्षकांना अनुभवता आले. निमित्त होते मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या गिरिमित्र विभागाने आयोजित केलेल्या साहसपट महोत्सवाचे! संघाच्या सभागृहात झालेल्या या महोत्सवासाठी राज्यभरातून २५०पेक्षा जास्त गिर्यारोहक, साहसवीर यांनी हजेरी लावली. या महोत्सवात साहसवीरांनी तयार केलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या मोहिमांचे लघुपट सादर झाले आणि या वीरांच्या धडाडीला, चिकाटीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.

मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात गेली २५ वर्षे गिरिमित्र संमेलन आयोजित केले जाते. संघाचे पदाधिकारी रवींद्र लाड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या संमेलनात संस्थात्मक गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांची आणि त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची नोंद घेतली जाते. लाड यांनीच सुरू केलेल्या गिर्यारोहण चित्रपट महोत्सवापासून प्रेरणा घेत यंदा साहसपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

राज्यातील विविध साहसी खेळांमधील व्यक्तींना एकत्र आणून त्यांचे कार्य गिरिप्रेमींसमोर यावे, यासाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात विविध साहसी खेळांमधील लघुपट सादर करण्यात आले. यात गिर्यारोहणासह पाण्यातील, हवेतील आणि जमिनीवरील इतर साहसी खेळांचाही समावेश होता. यात सायकलिंग , बेस जंपिंग, हायलाइन आदी साहसी खेळांशी संबंधित लघुपट पाहायला मिळाले.

लेह ते मनाली हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा प्रवास सलग २७ तास ५५ मिनिटांत आणि तोही सायकलवरून करणाऱ्या अवघ्या १८ वर्षांच्या ओम महाजन याच्यावरील लघुपटानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत ओमच्या साहस ाला दाद दिली. साडेसतरा हजार फूट उंचीपर्यंतच्या अनेक खिंडी पार करण्याचे अशक्य वाटावे, असे अद्वितीय साहस ओमने लीलया पेलल्याची भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

उंचीवर ताणलेल्या दोरीवर चालण्याचे साहस म्हणजेच ‘हायलाइन’ हा धाडसी खेळ लोणावळ्याजवळील नागफणी म्हणजेच ‘ड्युक्स नोज’ परिसरात काही निडर मुलींनी एकत्र येत खेळला. या अनोख्या ‘हायलाइन’ मेळाव्याचा थरार कॅमेऱ्यात चित्रबद्ध करत लघुपटातून मांडण्यात आला. अधिकाधिक मुलींनी एकत्र येत या खेळाकडे वळावे, हा या लघुपटामागचा उद्देश होता. रेले शिखर सर करणे, कांचनजुंगा मोहीम अशा मोहिमांवरील लघुपटांनीही उपस्थितांची उत्कंठा वाढवली.