दक्षिण मुंबईतील एका व्यक्तीची क्रेडिट कार्डच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली होती. तांत्रिक पुराव्यानुसार गुन्ह्याचे धागेदोरे कफ परेड पोलिसांना जामतारापर्यंत घेऊन गेले. येथून पोलिसांनी एका आठवी पास तरुणाला अटक केली. या चोराने सायबर गुन्ह्यांतून कोट्यवधींचा डोलारा उभा केल्याचे समोर आले. आलिशान बंगला, महागडी कार, दुकाने असे मोठे साम्राज्य या २५ वर्षांच्या तरुणाने गुन्ह्यांतून निर्माण केल्याचे पाहून पोलिसही चक्रावले.
दक्षिण मुंबईतील एका व्यक्तीने ‘एचडीएफसी’ क्रेडिट कार्ड कस्टमर केअर क्रमांकाचा गुगलवरून शोध घेतला असता, त्यांना एक क्रमांक मिळाला. यावर संपर्क केला असता, समोरील व्यक्तीने त्यांना ‘एपीके’ फाइल पाठवली आणि त्यांच्या मोबाइलचा ताबा घेऊन सुमारे सहा लाख रुपये परस्पर वळते केले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित देवकर, उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत यांच्यासह अनिल उदागे, वासिम शेख, अमर देशमुख यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्यात झारखंडच्या जामतारा येथील मझहर आलम मिया (२५) याचा सहभाग आढळला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे आढळलेली सिमकार्डे तसेच, इतर पुराव्यांवरून त्याच्याविरोधात सुमारे दहा राज्यांत ३६ तक्रारी असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता, मझहर हा गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांत सक्रिय असल्याचे उघड झाले. त्याने गुन्ह्यांतील पैशांतून आलिशान बंगलाही बांधला होता. हार्डवेअरचे दुकान सुरू करून आणखी एक व्यवसायाचे साधन उभे केले.

