पुणे : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण यांचा विचार करता मंदिर आणि परिसराचे कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी भीमाशंकर मंदिरात दैनंदिन दर्शन ३१ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ९ एप्रिलपर्यंत दर्शन बंद होते. त्यात मुदतवाढ करण्यात आली आहे. सध्याच्या जुन्या सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे. पायरी मार्गाचे काम सुरू आहे.
वृद्ध डॉक्टरची बारा कोटींची फसवणूक
पुणे : कमी कालावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी हडपसर परिसरातील ७५ वर्षीय डॉक्टरची १२ कोटी ३१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या सव्वा महिन्याच्या कालावधीत ही रक्कम चोरट्यांनी त्यांच्या खात्यात वळती केली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारदार भोसलेनगर, हडपसर येथे वास्तव्यास आहेत. जानेवारीत त्यांच्या मोबाइलवर आलेल्या संदेशातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे भासवून चोरट्यांनी विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही लाखांची गुंतवणूक केल्यानंतर बनावट ॲप किंवा प्लॅटफॉर्मवर मोठा नफा दाखवण्यात आला. त्यामुळे वृद्ध डॉक्टरने पुढील व्यवहार सुरूच ठेवले.
मधमाश्यांच्या हल्ल्यात दोन ठार
बुलढाणा/चंद्रपूर : बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात मधमाश्यांच्या हल्ल्याच्या दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना मंगळवारी घडल्या. बुलढाणा जिल्ह्यात अवघ्या सहा दिवसांत दुसरा बळी गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ५ एप्रिलच्या सकाळी ही घटना घडली. शेख वजीर शेख गफूर (वय ७०) असे मृताचे नाव आहे.
पुतळे बनविणाऱ्या केंद्राला ‘सील’
जालना : चुर्मापुरी (ता. अंबड) येथील शासकीय गायरानात उभारलेल्या कृषी अवजार निर्मिती केंद्राला जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी सील ठोकण्यात आले. याच ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बेकायदा तयार केले जात होते. राज्यभर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करणाऱ्या ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे (रा. महाकाळा, ता. अंबड) यांच्या चुर्मापुरी येथील ‘कृषी अवजार केंद्रा’च्या नावाखाली सुरू असलेला पुतळा निर्मितीचा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बनविले जात होते. ते सर्व पुतळे मोफत दिले जात होते.






