‘वाहतूक पूर्ववत करा’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पश्चिम आशियातील संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर चिंता व्यक्त केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक तातडीने पूर्ववत करण्याची मागणी भारताने केली आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध करत निष्पाप खलाशांच्या मृत्यूवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जागतिक व्यापारावर गांभीर्याने विचार व्हावा असे आवाहन केले.

india informs united nations for maritime traffic safety

‘पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सुरक्षित आणि विनाअडथळा सागरी वाहतूक तातडीने पूर्ववत करण्यात यावी,’ अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केली आहे.

‘सागरी क्षेत्रातील जलमार्गांची सुरक्षा आणि संरक्षण’ या विषयावर सुरक्षा परिषदेत आयोजित चर्चेत भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी (प्रभारी) राजदूत योजना पटेल यांनी भारताची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हिंसक कारवायांमध्ये निष्पाप भारतीय खलाशांना प्राण गमवावे लागले. हे स्वीकारार्ह नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, या मार्गावरील जागतिक व्यापारावर गांभीर्याने विचार व्हावा.’