भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा मंगळवारी रात्री केली. येत्या १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपकडून एकूण पाच जणांच्या यादीची घोषणा करीत पक्षातील निष्ठावतांना संधी दिली. पक्षाने या निवडणुकीसाठी सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर विधान परिषद पोटनिवडणुकीकरिता पक्षाकडून प्रज्ञा सातव यांना संधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांनी मंगळवारी रात्री ही यादी जाहीर केली आहे. या यादीत विधान परिषदेच्या नऊ नियमित जागांसह एका जागेवरील पोटनिवडणुकीसाठी १२ मे रोजी निवडणूक घोषित झाली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. त्यानुसार त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सातव यांनी २०३० पर्यंतचा कार्यकाळ मिळणार आहे. तर, १३ मे रोजी रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी संख्याबळानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यानुसार दिल्लीतून भाजपने पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी मिळाली आहे. विवेक कोल्हे यांचा अपवाद वगळता उर्वरित चारही नावे ही पक्षसंघटनेत दीर्घकाळ कार्यरत असलेली आहेत. या उमेदवारांपैकी कर्जतकर हे जनसंघापासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, पक्षातील ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीयांपैकी एक आहेत. तर डॉ. माधवी नाईक या मूळच्या ठाण्याच्या असून, त्यांनी महिला आघाडीची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघ परिवाराचा आणि भाजपचा समन्वय साधणारे संजय भेंडे हे सहकारी चळवळीतले प्रगल्भ नेते आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पक्षाला कोकणात अपेक्षित यश मिळाले आहे. या यशात पक्षाचे पदाधिकारी प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली होती. त्यानुसार पक्षाने जठार यांना संधी देत भाजपने राणे कुटुंबीयांनाही इशारा दिल्याची चर्चा आहे. तर विवेक विपीन कोल्हे हे शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. त्यांच्या आई स्नेहलता कोल्हे या माजी आमदार होत्या. त्यामुळे कोल्हेंना दिलेली उमेदवारी अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षाला बळ देईल, असे बोलले जात आहे.
भाजपकडून परिषदेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असली तरी महाविकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण निवडणूक लढविणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही. ‘मविआ’कडून शिवसेना ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर जवळपास एकमत झाल्याचे कळते, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक उमेदवार देण्यात येणार असून, त्याविषयीही अद्याप दोन्ही पक्षांनी नावे जाहीर केलेली नाहीत. शिवसेनेमध्ये नीलम गोऱ्हे या पुन्हा आमदारकी मिळविण्यास इच्छुक असल्या तरी पक्षातून त्यांच्या नावाला काहींचा विरोध असल्याचे कळते. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून जय पवार यांनी ही निवडणूक लढवावी असा एक मतप्रवाह असला तरी एका उद्योगपती माजी खासदाराच्या मुलाला तिकीट द्यावे, याविषयीही काही जणांनी पक्षश्रेष्ठींना गळ घातल्याचे कळते. दरम्यान, बिहार येथे होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सूर्यकुमार शर्मा (अरविंद शर्मा) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.





