वडे तळत असताना सिलिंडर संपल्याने आचाऱ्याने सिलिंडरमधील उरलेला गॅस वापरावा, याकरिता सिलिंडर आडवा केला. त्यामुळे सिलिंडरने पेट घेतला आणि आग बाजूच्या कपड्याच्या दुकानाला आणि स्टेशनरीच्या दुकानात पसरली. यामुळे पाचही दुकाने जळून खाक झाली. हडपसर येथील गोंधळनगरमध्ये माउली वडापावच्या दुकानात ही घटना घडली.
आग लागलेल्या दुकानावरील सदनिकेमधील नागरिकांना मदतीसाठी आलेल्या युवकांनी सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशामक केंद्राच्या पाच गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, यात दुकाने जळून खाक झाली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली.
अग्निशामक केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास, गोंधळेनगर महापालिकेच्या भाजी मार्केटशेजारील गोल्डन ड्रीम या इमारतीतील ‘माउली वडापाव’च्या दुकानासमोर दुकानाचा मालक आणि आचारी सुनील देशमाने वडे तळत होता. सिलिंडर संपल्याने सिलिंडर आडवा करून गॅस वापरण्याच्या प्रयत्नात असताना सिलिंडरने पेट घेतला. आग पाहून आचाऱ्याने पळ काढला. मात्र, त्यातून निघालेली आग शेजारच्या संजय चाबुकस्वार यांच्या कपड्याच्या दुकानाला लागली.
दुकानाच्या बाहेर फ्रीज आणि कपडे असल्याने दुकानातील सर्व साहित्याला भीषण आग लागली. पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशामक दलाने आग विझवून नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. एका सदनिकेतील गॅलरीतील वॉशिंग मशिन जळाले. अग्निशामक अधिकारी प्रमोद सोनवणे व अनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत जवानांनी कामगिरी केली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षक बच्चूसिंग टाक, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे, असलम पानसरे, संतोष होडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. या वेळी स्थानिक नगरसेविका उज्वला जंगले, वैशाली बनकर, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष प्रशांत तुपे, पोलिस उपायुक्त वैशाली शिवणकर व पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी भेट दिली.





