लोहगावात बंगल्यात केली गांजाची शेती

महाराष्ट्र टाइम्स

लोहगाव परिसरात एका भाड्याच्या बंगल्यात गांजाची शेती करून विक्री होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४१ गांजाची झाडे आणि गांजा जप्त केला. गुजरात येथील हर्ष भरतकुमार पांचाल याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

cannabis cultivation busted in a bungalow in lohgaon

लोहगाव परिसरात भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात गांजाची शेती करून विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गांजाची लागवड केलेली ४१ झाडे आणि गांजा असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोहगाव, मूळ गाव गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर अमली पदार्थविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

लोहगावमधील पठारे वस्तीतील एका बंगल्यात गांजाची शेती करून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी आकाश मोरे आणि अमोल आदलिंग यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांना माहिती दिल्यावर पथक बंगल्यात दाखल झाले. त्या वेळी बंगल्याच्या आवारात आरोपी पांचाल याने ४१ झाडांची लागवड केल्याचे दिसून आले.

पोलिसांनी सर्व झाडे ताब्यात घेतली असून, कारच्या तपासणीत गांजा आढळला. पोलिसांनी गांजाची झाडे, विक्रीसाठीचा गांजा आणि कार असे मिळून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी गुजरातचा असून, त्याने भाड्याने बंगला घेऊन त्याच ठिकाणी चोरून गांजाची शेती करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शुभांगी मगदूम, उपनिरीक्षक मनोज बरुरे आदींच्या पथकाने कामगिरी केली.