केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील १६ व्या जनगणनेची प्रशासकीय तयारी महापालिका स्तरावर पूर्ण झाली आहे. यंदा प्रथमच डिजिटल जनगणना होणार असून, १ मेपासून ‘स्व-गणने’ला प्रारंभ होत आहे. नागरिकांना जनगणनेच्या पोर्टलवर जाऊन स्वत:च आपली व आपल्या कुटुंबाची नोंदणी करता येणार आहे.
दोन टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेसाठी ४२११ प्रगणक , पर्यवेक्षक, फिल्ड वर्कर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या जनगणनेअंती शहराची लोकसंख्या २५ लाखांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात १ मेपासून देशभर जनगणना सुरू केली जाणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत केली जाणार आहे.
पहिला टप्पा मेपासून
यात घरयादी व घरगणना केली जाणार आहे. यात इमारती गणना, घरे आणि कुटुंबे यांची ओळख करून प्रणालीबद्ध नोंद केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाईल. या जनगणनेसाठी नाशिक शहरात ३१५२ घरयादी गट तयार करण्यात आले आहेत. ३५०० प्रगणक व ६५० पर्यवेक्षकांमार्फत ही जनगणना केली जाणार आहे. जनगणना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ६१ फिल्ड ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. यात महापालिकेसह अन्य शासकीय विभागांच्या अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांचा समवेश आहे.
दुसरा टप्पा २०२७ मध्ये
घरगणना पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये राबविला जाईल. साधारणत: महिनाभरात लोकसंख्येची गणना पूर्ण केली जाणे अपेक्षित आहे.
विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचननेनुसार महापालिकेच्या हद्दीतील जनगणनेसाठी महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनानुसार शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांच्या नेतृत्वाखाली जनगणना कक्ष तयार करण्यात आला आहे.





