‘डीजे’च्या आवाजात ‘कावडी’चा हरवलाय ताल!

Contributed by@timesofindia.com,फणिंद्र मंडलिकfanindra.mandlik@timesofindia.com,लोकनृत्य अभ्यासक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडाच्या यात्रेत कावडीचे महत्त्व आहे. पूर्वी कावडीसोबत पारंपरिक नृत्य केले जात असे. आता डीजेच्या आवाजामुळे हे नृत्य कमी झाले आहे. जुन्या काळातील कावडीचा ताल आणि उत्साह आता दिसत नाही. तरुण पिढी डीजेवर नाचते, पण त्यात पारंपरिक संस्कृतीचा अभाव जाणवतो. जुने जाणकार या बदलावर खंत व्यक्त करतात.

the original rhythm of kawdi dance at saptashrungi fort is disappearing

चैत्र महिना उजाडला की नाशिकच्या मातीला वेध लागतात ते सप्तश्रृंगी गडाच्या यात्रेचे आणि श्रद्धेने खांद्यावर घेतल्या जाणाऱ्या कावडीचे. त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्त तीर्थावरून पाणी भरून अनवाणी पायाने गडावर जाण्याची ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे. मात्र, बदलत्या काळानुसार या परंपरेतील भक्तीचा ‘नाद’ टिकून असला तरी, अंगात उत्साह भरणारे पारंपरिक ‘ कावडी नृत्य ’ आता डीजेच्या दणदणाटात लुप्त होऊ लागले आहे.

कुशावर्तातून पाणी भरल्यानंतर ती कावड देवीच्या अभिषेकापर्यंत खाली ठेवायची नसते, असा कडक नियम आहे. मैलोनमैल चालताना येणारा शारीरिक थकवा दूर व्हावा आणि भक्तांच्या अंगात नवचैतन्य संचारले जावे, यासाठी एक विशिष्ट प्रकारचे नृत्य केले जात असे. पायांच्या ठेक्यावर आणि शरीराच्या विशिष्ट हालचालींवर आधारित असलेल्या या प्रकारालाच ‘कावडी नृत्य’ असे संबोधले जाते. या नृत्यामुळे कावड पेलणाऱ्याला वजनाचे भान राहत नसे आणि भक्तीच्या रसात तो न्हाऊन निघत असे. सुरुवातीला केवळ चर्म वाद्यांचा वापर केला जात होता, नंतर त्यात धून आली.

काही दशकांपूर्वीपर्यंत या नृत्यासाठी ग्रामीण भागातील कलाकार ‘बुलबुल’ आणि ‘कॅसिओ’ या वाद्यांचा वापर करीत असत. या वाद्यांतून निघणारी कावडीची विशिष्ट धून ऐकली की अबालवृद्धांचे पाय आपोआप थिरकू लागत. मात्र, गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान आणि उत्सवांचे स्वरूपही बदलले. गणेशोत्सव असो वा लग्नाची मिरवणूक, सगळीकडे डीजेचा बोलबाला वाढला आहे. या कृत्रिम आवाजाच्या लाटेत कावडीच्या त्या मूळ तालाची गोडी आणि लय हरवली आहे.

आजकाल कावडी निघतात, पण त्यासोबत पारंपरिक वाद्ये वाजवणारे कलाकार दिसत नाहीत. डीजेवर वाजणाऱ्या धांगडधिंग्या गाण्यांवर तरुण पिढी थिरकते खरी, पण त्यात कावडी नृत्याचा तो मूळ डौल आणि संस्कृतीचा वास उरलेला नाही. ‘जुन्या काळी कावडीच्या धूनवर नाचताना थकवा जाणवत नसे, आता केवळ आवाजाचा धिंगाणा उरला आहे,’ अशी खंत जुने जाणकार व्यक्त करीत आहेत.