एमआयडीसी रोड परिसरात ‘वैभव वाइन्स’च्या शेजारी सुरू असलेल्या बेकायदा ‘ ओपन बार ’वर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संतोष शहा (गुड्डू पान शॉप), अशोक लोंढे (टी टपरी) आणि अशिष वाल्मिकी (अंडा भुर्जी टपरी), नौशाद मुलानी (नूर चिकन सेंटर) या चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी वाइन दुकानाला लेखी नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सात ते ९.३० दरम्यान गस्त घालताना संतोष शहा, अशोक लोंढे हे दोघे ‘वैभव वाइन्स’मधून दारू घेऊन बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना रस्त्याच्या कडेलाच ग्लास, पाणी आणि इतर साहित्य विकत देत होते. तेथेच बसून मद्यपान करण्यास थेट प्रोत्साहन देऊन ‘ओपन बार’च उघडपणे चालवत होते. आशिष वाल्मिकी आणि नौशाद मुलाणी हे दोघे परवान्याविना व्यवसाय करीत असल्याचे समोर आले. कचरा थेट रस्त्यावर टाकून ते परिसरही अस्वच्छ करीत होते; म्हणून पोलिसांनी चौघांविरुद्ध मुंबई पोलिस कायदा कलम ३३ (डब्ल्यू) आणि ११५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. संबंधितांचे साहित्य आणि वाहने जप्त केली असून, प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
‘‘एमआयडीसी’ रोड परिसरात गस्त घालताना बेकायदा ‘ओपन बार’ चालवला जात असल्याचे दिसल्यामुळे ही कारवाई केली. आगामी काळात रस्त्यावर मद्यपानास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,’ असे बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.






