जन्मतः दृष्टिहीन असतानाही ईश्वरीने सातत्याने खुल्या पाण्यातील आव्हानांवर मात करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. तिचे वडील कमलेश आणि आई अरुणा सदैव पाठीशी उभे होते, अशी भावना ईश्वरीने व्यक्त केली.
नागपूरची १७ वर्षीय दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी कमलेश पांडे हिने जिद्द आणि धैर्याच्या जोरावर ‘ पाल्क सामुद्रधुनी ’ पार करत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करणारी ती जगातील पहिली पूर्णपणे दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे.
ईश्वरीने ६ एप्रिल २०२६ रोजी श्रीलंकेतील तलाईमन्नारजवळील उरमालाई पॉइंट येथून पहाटे ४ वाजता जलतरणास सुरुवात केली. तब्बल ११ तास १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी ३.१५ वाजता ती धनुष्कोडी येथील अरिचलमुनई येथे पोहोचली. या दरम्यान तिने सुमारे २९ किलोमीटरचा समुद्री प्रवास पूर्ण केला. समुद्रातील जोरदार प्रवाह, बदलत्या लाटा आणि जेलीफिशचा धोका अशा प्रतिकूल परिस्थितीतही ईश्वरीने अपूर्व सहनशक्ती आणि मानसिक कणखरता दाखवली. जन्मतःच दृष्टिहीन असतानाही तिने सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटीच्या जोरावर खुल्या पाण्यातील जलतरणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या जलतरण मोहिमेचे आयोजन थेनी येथील ‘ओपन वॉटर स्विमिंग ॲकॅडमी’तर्फे करण्यात आले होते. मोहिमेदरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि तमिळनाडू राज्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पराक्रमाची नोंद करण्यात आली.
या ऐतिहासिक प्रयत्नाचे निरीक्षण पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे एम. विजयकुमार, तमिळनाडू ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचे जयकुमार तसेच सुखदेव धुर्वे यांनी केले. हा उपक्रम नागपूर येथील शार्क अ ॅक्वाटिक स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संजय बाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पराक्रम झाला. तसेच भावी राजगिरे, ईशांत पांडे, संदीप वैद्य, नीरव पांडिया यांनी सहकार्य केले, तर डॉ. अभय राजगिरे यांनी वैद्यकीय देखरेख सांभाळली. या विक्रमासाठी समाजातून निधी गोळा करण्यात आला होता.






