खरातने ‘एसआयटी’च्या चौकशीत सुरुवातीला ‘तो पूजाविधीचा भाग होता’, असे म्हणत लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर मौन धारण केले होते. परंतु, चहूबाजूंनी अडकलेल्या खरातने स्पष्ट माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ‘होय, लैंगिक संबंध ठेवले’, असेही त्याने स्पष्ट केले. खरातकडे अनोळखी व्यक्तींना जाण्याची परवानगी नव्हती. त्याच्या आप्तेष्टांसह ‘भक्तांच्या’ माध्यमातून खरातपर्यंत पोहोचता येत होते. त्यामुळे अगोदरच महिलांची माहिती संकलित करून अंकशास्त्राच्या क्लृप्त्या वापरून तो गंडवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैवी शक्ती, तंत्र-मंत्र, भविष्यवाणीच्या दाव्यातून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोक खरातच्या बेहिशेबी मालमत्तेबाबतचा तपास सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) खरातचे शंभरपेक्षा जास्त दस्तऐवजांची माहिती ‘ईडी’कडे सुपूर्द केली आहे. यासह खरातला उर्वरित सर्व गुन्ह्यांत अटक होणार असून, पुढील चाळीस दिवसांत सर्व गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे ‘एसआयटी’ने सांगितले.
महिला अत्याचाराचे आठ गुन्हे व खंडणी, खासगी सावकारीसह फसवणुकीचे पाच गुन्हे नोंद असलेल्या खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि. ७) महाराष्ट्र पोलिस अकादमीत ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ‘एसआयटी’ प्रमुख पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, अमोल भारती, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी खरातच्या ‘सीडीआर’बाबत बाहेर आलेल्या माहितीचा तपास राज्यस्तरावर सुरू आहे. त्याबाबत शासनस्तरावर माहिती स्पष्ट करण्यात येईल, असे ‘एसआयटी’ने सांगितले. यासह खरातविरुद्ध पुढील चाळीस दिवसांत विविध गुन्ह्यांतील दोषारोपपत्र दाखल करणार आहोत. त्याबाबतचा सखोल तपास आणि पुरावे संकलित केले जात आहेत. खरातची दोन गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिस कोठडी झाली असून, अत्याचाराच्या गुन्ह्यांतही ‘एसआयटी’ खरातला अटक करणार आहे.
चाकणकरांना नोटीस नाही!
खरात प्रकरणात आतापर्यंत फक्त त्याचा मुलगा हर्षवर्धन, पत्नी कल्पना यांची चौकशी केली आहे. खरातच्या मुलीचीही चौकशी लवकरच होणार असून, याव्यतिरिक्त कोणाचीही चौकशी झालेली नाही. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ‘एसआयटी’ने कोणतीही नोटीस बजावली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.




