‘भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात विजय जवळपास निश्चित केला असून, या टप्प्यातील ११० जागा पक्ष जिंकेल. सत्तेत आल्यानंतर भाजप नागरिकत्व दुरुस्ती कायदा ( सीएए ) त्वरित लागू करेल, घुसखोरांविरुद्ध कारवाई करेल आणि महिलांसाठी ‘भयमुक्त’ बंगाल निर्माण करेल,’ असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिले.
पूर्व बर्धमान जिल्ह्यातील जमालपूर आणि हावडामधील श्यामपूर येथे पाठोपाठ झालेल्या प्रचारसभांमध्ये शहा यांनी मतुआ समाजासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), महिला सुरक्षा आणि बांगलादेशातून कथित घुसखोरी हे तीन मुद्दे ठळकपणे मांडले. ‘ही निवडणूक म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला पूर्णविराम देण्याची लढाई आहे,’ असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालमधील २९४ पैकी १५२ विधानसभा मतदारसंघांत २३ एप्रिल रोजी सुमारे ९३ टक्के मतदान झाले. उर्वरित १४२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, निकाल ४ मे रोजी जाहीर होतील.
सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या मतुआ समाजाची मते निर्णायक मानली जातात. ममता बॅनर्जी यांनी मतपेढीच्या राजकारणासाठी जाणीवपूर्वक ‘सीएए’ची अंमलबजावणी रोखून निर्वासित कुटुंबांना अनिश्चिततेत ठेवले, असा आरोप शहा यांनी केला. ‘दीदी सीएए लागू होऊ देत नाहीत. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर ५ मेनंतर मतुआ समाजातील प्रत्येक बंधू-भगिनीला नागरिकत्व मिळवून देऊ,’ असे ते म्हणाले.
मतुआ समाजातील अनेक सदस्य बांगलादेशातून स्थलांतरित झाले असून, नागरिकत्वाच्या प्रश्नाशी त्यांचा भावनिक संबंध आहे. ‘बंगालमधील घुसखोर आपल्या तरुणांच्या नोकऱ्या आणि गरिबांचे रेशन हिरावून घेत आहेत. दीदी आणि त्यांचे भाचे, तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, हे मतपेढीसाठी घुसखोरांना संरक्षण देत आहेत. ५ मेनंतर भाजप सरकार प्रत्येक घुसखोराला शोधून काढेल,’ असे शहा म्हणाले.






