‘कोणत्याही देवाला आपल्या भक्तांची जमीन जावी, असे वाटणार नाही; पण महाराष्ट्रातील एका ‘देवा’ला शक्तीपिठासाठी जमीन हवी आहे. त्या देवाच्या इच्छेसाठी सामान्य जनतेच्या भावना डावलल्या जात आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी ईश्वरपूर येथे केली.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात शनिवारी ईश्वरपूर येथे मेळावा झाला. या वेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. ‘सनदशीर मार्गाने आमची भूमिका मांडून आम्ही विनंती करत आहोत, मात्र आमची परंपरा क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांची आहे,’ असा इशाराही पाटील यांनी या वेळी सरकारला दिला.
पाटील म्हणाले, ‘पूर्वी ८०२ किमी असलेला शक्तीपीठ महामार्ग आता ८५६ किमीपर्यंत वाढवण्यात आला आहे. लांबी वाढली, तसाच खर्चही वाढला. भराव टाकून रस्ता उभारण्याची योजना आहे; पण अशा रस्त्याची गुणवत्ता काय असेल, हे आपण पाहिलेलेच आहे. या प्रकल्पामुळे गावांची विभागणी होणार आहे. बाधितांना वाढीव मोबदला मिळेल, अशी हवा तयार केली जात आहे. यापासून सावध राहणे गरजेचे आहे. आमच्या वाळवा तालुक्यात सर्व काही सुरळीत सुरू असताना, हा अनावश्यक रस्ता आमच्यावर का लादला जातोय? विविध देवस्थानांना जोडणारे मार्ग आधीपासून अस्तित्वात आहेत, मग नव्या मार्गाचा हा अट्टाहास कशासाठी,’ असा सवाल त्यांनी केला.
‘जमीन ही आपल्या पूर्वजांची देणगी, कष्टाने जोपासलेला अमूल्य वारसा आहे. आपल्या जीवनाचा आधार आहे. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवून, आपल्या जमिनी आणि हक्कांसाठी एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे,’ असे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.






