जाहिरात फलकावर ‘क्यूआर कोड’ सक्ती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे शहरात आता सर्व होर्डिंगवर क्यूआर कोड बंधनकारक असणार आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. हा कोड स्कॅन केल्यावर होर्डिंगची संपूर्ण माहिती मिळेल. या नियमाचे पालन न करणाऱ्या होर्डिंगवर कारवाई केली जाईल. सोलापूर, नागपूर, सांगली, बुलढाणा आणि यवतमाळ येथे घडलेल्या विविध घटनांचीही माहिती यात दिली आहे.

qr code mandatory on all official billboards in pune

पुणे : शहरातील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर ( होर्डिंग ) ‘ क्यूआर कोड ’ लावणे सक्तीचे असून, त्याची कडक अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर सर्वांना या होर्डिंगबाबतची सर्वंकष माहिती उपलब्ध होईल. असा कोड नसलेली होर्डिंग अनधिकृत समजून त्यावर कारवाई केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत शहरातील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर ‘क्यूआर’ कोड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने नऊ मे २०२२ रोजी लागू केलेल्या जाहिरात नियंत्रण नियमावलीनुसार ही कार्यवाही केली जात आहे.

आईसह मुले बुडाली

सोलापूर : गावाजवळील साठवण तलावावर कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन मुलांसह तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात शनिवारी घडली. वैशाली अनिल घोडके (वय ३५) , श्रेया अनिल घोडके (वय १२) आणि सोहम अनिल घोडके (वय १०) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे खडकी गावावर शोककळा पसरली आहे.

सहाय्यक अटकेत

नागपूर : बांधकामाशी संबंधित अपील प्रकरण निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल साहाय्यकाला रंगेहाथ पकडले. एसीबीने आरोपीच्या घरीच सापळा रचला होता. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. नरेश साधूराव बर्वे (वय ५४, रा. नंदनवन लेआउट) असे लाचखोराचे नाव आहे.

दोघांचा बुडून मृत्यू

सांगली : जत तालुक्यातील सनमडी येथील तलावात पाय घसरून पडल्याने दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हर्षद संजय कांबळे (वय १७) व जगदीश वसंत मोरे (वय १५, दोघेही रा. कुणीकोणूर) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. कांबळे व मोरे दोघेही जवळचे नातलग आहेत. या घटनेने कुणीकोणूर गावावर शोककळा पसरली आहे.

हल्ला करणारा अटकेत

बुलढाणा : नांदुरा येथील तहसील कार्यालयात शिरून तहसीलदार अजितराव जंगम यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी समाधान मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. नांदुऱ्याचे तहसीलदार अजितराव जंगम हे २३ एप्रिल रोजी मोताळा ते नांदुरा बायपासजवळील रेतीच्या वाहनांवर कारवाई करीत होते. बुलढाणा येथील समाधान भगवान मोरे याच्या मालकीचा टिप्पर (एमएच २८ एबी ७६३८) रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आला.

चार शेतकरी आत्महत्या

यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी तीन शेतकरी आत्महत्या मारेगाव तालुक्यातील, तर एक घटना दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील आहे. संजय प्रल्हाद हिवाळे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मारेगाव येथील शेतकरी अविनाश लटारी पानघाटे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. मारेगाव तालुक्यातील पार्डी येथील कैलास चंद्रभान गाडगे (वय ५५) या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तर मारेगाव तालुक्यातील सुर्ला येथील शेतकरी विलास मेश्राम यांनीही सततची नापिकी व आर्थिक टंचाई यामुळे आत्महत्या केली.

मुंडन करून मुलीला डांबले

अमरावती : आपल्या मुलीचे सौंदर्य आणि तिचे लांब केस मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत, या संशयातून आई-वडिलांनी स्वत:च्या १६ वर्षीय मुलीचे मुंडन करून तिला घरात डांबल्याचा प्रकार वरुड तालुक्यात उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली असून, मुलीला सुधारगृहात दाखल केले. मुलगी शाळेत व शिकवणीला जात असताना एक तरुण तिचा पाठलाग करीत असल्याचा संशय पालकांना होता.