वृक्षतोडीस हरित लवादाची स्थगिती

महाराष्ट्र टाइम्स

शहरातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली आहे. २८ एप्रिलपर्यंत झाडे न तोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासनाने लेखी आदेशाशिवाय काम सुरू ठेवले. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. रस्ते रुंदीकरण आणि विकासकामांसाठी वृक्षतोड सुरू होती. मनीष बाविस्कर यांनी लवादाकडे याचिका दाखल केली होती.

green tribunals stay on tree cutting in the city sparks outrage among environmentalists

शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वृक्षतोडीला अखेर राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली आहे. मंगळवारी (दि. ७) झालेल्या सुनावणीत लवादाने २८ एप्रिलपर्यंत एकही झाड न तोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासकीय तांत्रिकतेचे कारण पुढे करत महापालिकेने सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरूच ठेवल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शहरातील रस्ते रुंदीकरण आणि विकासकामांच्या नावाखाली गंगापूररोड आणि म्हसरूळ परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू होती. यामुळे शहराचे वैभव असलेले जुने वृक्ष नष्ट होत असल्याचा दावा करीत मनीष बाविस्कर यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर लवादाने तातडीने ही स्थगिती दिली. लवादाचा निर्णय आल्यानंतर पर्यावरण कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला वृक्षतोड थांबवण्याची विनंती केली. मात्र, आम्हाला अद्याप अधिकृत लेखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही, तोपर्यंत आम्ही आमचे काम सुरूच ठेवणार, अशी भूमिका घेत महापालिका कर्मचाऱ्यांनी गंगापूररोड आणि म्हसरूळ भागात वृक्षतोड सुरूच ठेवली होती.