भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पहाटे चार वाजून ३० मिनिटांनी नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेतील अवकाशकुपीचा चंद्रापासून सर्वात कमी म्हणजे ६५४५ किलोमीटर अंतरावरून प्रवास झाला. त्यानंतर दोन मिनिटांनी कुपी पृथ्वीपासून ४,०६,७७१ किलोमीटर इतक्या सर्वाधिक अंतरावर पोचली. या काळात चंद्रापलीकडे गेल्यामुळे कुपीचा पृथ्वीवरील केंद्राशी सुमारे चाळीस मिनिटे संपर्क तुटला होता.
अंतराळवीरांनी सलग सात तास अखंड निरीक्षणे नोंदवून त्यांनी चंद्राचे अनेक अज्ञात पैलू समोर आणले. चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजुवरून प्रवास करताना त्यांनी त्यावरील विवरे, डोंगर, दऱ्या, लाव्हाचे प्राचीन प्रवाह यांचे छायाचित्रण केले. चंद्रावरील भूरचनांचे मानवी डोळ्यांना दिसणारे रंग, तेजस्विता, तपशील याच्या नोंदी घेतल्या. या प्रवासादरम्यान त्यांना चंद्राच्या क्षितिजावर पृथ्वी मावळताना आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा उगवतानाचे दृश्य दिसले. या मोहिमेत सर्वात उत्कंठावर्धक निरीक्षण ठरले ते सूर्यग्रहणाचे. चंद्राच्या सावलीतून प्रवास करताना अंतराळवीरांनी सुमारे तासभर खग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला. या काळात त्यांनी सूर्याचे वातावरण म्हणजे करोनाच्या नोंदी घेतल्या. चंद्राच्या अंधाऱ्या भागावरून प्रवास करताना चंद्रावरील अशनीपाताच्या प्रकाशमान घटनाही अंतराळवीरांनी टिपल्या. चंद्राच्या भूमीवरची आजपर्यंतची अज्ञात विवरे शोधून त्यांचे अवकाशातून नामकरणही अंतराळवीरांनी केले.
असे होईल पुनरागमन
आर्टेमिस २ मोहिमेतील मुख्य कार्यपूर्ती झाल्यावर भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी ओरायन अवकाशकुपी चंद्राच्या गुरुत्वीय प्रभावातून बाहेर पडली. पाठोपाठ रात्री १२ वाजून १० मिनिटांनी आर्टेमिस २ मोहिमेतील चार अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील अंतराळवीरांशी रेडिओ संपर्काद्वारे संवाद साधला. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी सहा वाजून ३३ मिनिटांनी अवकाशकुपीचे इंजिन काही काळासाठी सुरू करून अंतराळवीरांच्या पृथ्वीवरील आगमनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार ११ एप्रिलला पहाटे पाच वाजून ३७ मिनिटांनी चार अंतराळवीरांसह ओरायन अवकाशकुपी सॅन दिएगोजवळ प्रशांत महासागरात अलगद उतरेल.






