...तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या कोलकात्यावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कडक प्रत्युत्तर दिले. त्यांनी पाकिस्तानला ५५ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची आठवण करून देत पुन्हा तसे झाल्यास पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे देवालाच ठाऊक असे म्हटले. या विधानानंतर भारतीय राजकारणातही पडसाद उमटले असून तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

...तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील?

भारताच्या कोलकात्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले.

‘पाकिस्तानने चिथावणीखोर विधाने करणे थांबवावे; अन्यथा ५५ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, तशीच परिस्थिती पुन्हा ओढवेल. जर त्यांनी बंगालकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर यावेळेस पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे केवळ देवालाच ठाऊक’, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी सुनावले.

राजनाथ सिंह म्हणाले की, ‘पाकिस्तानने भूतकाळातील परिणामातून धडा घ्यायला हवा. ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच विधान केले होते की, भारताने भविष्यात कोणतेही धाडस केल्यास इस्लामाबाद कोलकात्यावर हल्ला करून चोख प्रत्युत्तर देईल.’ या विधानानंतर भारतीय राजकारणातही याचे पडसाद उमटले आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘स्वतःला ५६ इंच छातीचे म्हणवणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री निवडणुकीच्या प्रचारात इतके व्यस्त आहेत की त्यांना बंगालवरील बाह्य आक्रमणाच्या धमकीला उत्तर द्यायला वेळ नाही.’

‘पाकने उघडपणे कोलकात्याला लक्ष्य करण्याची धमकी देऊनही केंद्र सरकारने याचा निषेध करण्याचे धाडस दाखवले नाही. जर तुमच्यात हिंमत असेल, तर सीमा सुरक्षा दल व भारतीय सैन्याला मोकळीक देऊन पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन दाखवा,’असे आव्हानही बॅनर्जी यांनी मोदी, शहा यांना दिले आहे.