नवी दिल्ली : भारताच्या वैष्णवी आडकरला बिली जीन किंग कप टेनिस स्पर्धेतील आशिया/ओशनिया ग्रुप १च्या पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे थायलंडविरुद्ध भारतीय संघ ०-१ने पिछाडीवर आहे.
पावसामुळे खेळ तीन तास उशिराने सुरू झाला. ज्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा होता. या नव्या मोसमाशी वैष्णवीला जुळवून घेता आले नाही. वैष्णवीला औंचिसा चांताकडून १-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. ही लढत एक तास आणि १३ मिनिटे चालली. वैष्णवी जागतिक क्रमवारी ३८३ क्रमांकावर आहे. ती चांतापेक्षा क्रमवारीत ७३ क्रमांकांनी पुढे आहे. वैष्णवीला आपल्या चुकांचा फटका बसला. टाळत्या येण्यासारख्या अनेक चुका तिच्याकडून झाल्या. त्यामुळे केवळ २३ मिनिटांत वैष्णवीला पहिला सेट गमवावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये वैष्णवीने लढा दिला खरा; पण चांताचे आव्हान परतवून लावण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही.




