दर, तुम्ही अधेमधे इंग्लिश शब्द झाडता, ते यापुढे बंद झाले पाहिजे...’ आमच्या चिरंजीवांनी आज्ञा केली. ती ऐकून आधी आम्ही अचंबित झालो, नंतर त्यांच्यावर चिडलो; परंतु तोपर्यंत ‘कार्ट्या...’ असे म्हणू सौं.नी त्यांच्या पाठीत दणका घातला होता. ‘वडिलांना सुनावतोस? लाज आहे का काही...’ सौं.च्या या वाक्यामध्ये चिरंजीवांनी आम्हाला काही बोलणे यापेक्षा त्यांचा हक्कभंग होणे ही भावना अधिक होती! ‘तसे नाही मदर... यू मस्ट स्पीक इन मराठी इन महाराष्ट्र...’ चिरंजीव. ‘मेल्या, आधी आम्हाला आई-बाबा म्हणायला शिक. तुझ्या बोलण्यात क्रियापदे सोडली, तर मराठी शब्द किती असतात ते सांग आधी,’ सौ. उत्तरल्या. ‘आणि काय रे गधड्या, तुला आज एकदम मराठीचा पुळका कसा आला?’ ‘फादर, आपले ट्रॅव्हलचे मंत्री आहेत ना ते... त्यांनी सांगितले आहे, की ऑल द रिक्षावाला अँड टॅक्सीवाला मस्ट स्पीक इन मराठी.’ ‘त्याचा आणि माझा काय संबंध? मी बँकेतून निवृत्त झालोय ना?’ ‘निवृत्त... हां रिटायर्ड... दॅट्स राइट बट इफ यू हॅव टु ट्रॅव्हल बाय रिक्षा, देन यू शुड ऑल्सो हॅव टु टॉक इन मराठी विथ हिम... म्हणून तुम्ही शिकून घ्या.’ ‘अरे, आम्हाला येतेच मराठी नीट. पण तू बोलताना इंग्रजी आणि मराठी यांची अशी काही मिसळ करतोस, की या दोन्ही भाषा एकमेकींकडे बुचकळ्याने पाहायला लागतात,’ आम्ही उत्तर दिले. चिरंजीवांचा मुद्दा बरोबर होता. फक्त तो त्यांनाच लागू होणारा होता. आम्ही त्यांना इंग्रजी माध्यमात घातले. घरात त्यांच्याशी रेटून इंग्रजीत बोलू लागलो. शेवटी शाळेतून निरोप आला, ‘तुम्ही नका बोलू. मुलाची भाषा बिघडते...’ मुद्दा असा, की आम्ही त्यांना इंग्रजीकडे फक्त ढकलले. त्यामुळे त्यांना ना मराठीची गोडी, ना इंग्रजीची. आता ते जी भाषा बोलतात ती कोणती, हा प्रश्न पडतो. तस्मात, रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या आधी आमच्यासारखे पालक (पेरेंट्स) आणि पाल्य (चिल्ड्रन) यांना मायबोलीचा अर्थ समजावून सांगायला हवा. महाराष्ट्र दिनाचा हादेखील एक सांगावा आहे.- चकोर





